प्रश्नः
जुन्या करारात ख्रिस्ताच्या आगमनाचे भाकित कोठे करण्यात आले आहे?
उत्तरः
येशू ख्रिस्ताविषयी जुन्या करारात अनेक भविष्यवाण्या आहेत. काही व्याख्याकार सांगतात की येशू ख्रिस्ताविषयी शेकडो भविष्यवाण्या आहेत. खालील भाकिते सर्वात स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण समजली जातात.
येशूच्या जन्माविषयी - यशया 7:14: “ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.” यशया 9:6: “कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.” मीका 5:2: “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.”
येशूची सेवा आणि मृत्यूविषयी - जखऱ्या 9:9: “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” स्तोत्र 22:16-18: “कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.”
तसेच येशूविषयी सर्वात स्पष्ट भविष्यवाणी म्हणजे यशयाचा संपूर्ण 53वा अध्याय. यशया 53:3-7 स्पष्टपणे अचूक आहे: “तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.“
दानीएलाच्या नवव्या अध्यायात सांगितलेली “सत्तर सप्तके” ही भविष्यवाणी निश्चित तिथी सांगते जेव्हा येशू, ख्रिस्ताचा “वध होईल.” यशया 50:6 अचूकपणे येशूला सहन कराव्या लागणाऱ्या मारहाणीचे वर्णन करते. जखऱ्या 12:10 ख्रिस्तास “वेधण्याविषयी” भाकित सांगते, जे वधस्तंभावर येशूच्या मरणानंतर घडले. अनेक उदाहरणे देता येतील, पण ही पुरेशी ठरतील. जुना करार अत्यंत स्पष्टपणे मशीहा म्हणून येशूचा आगमनाविषयी भविष्यकथन करतो.
English
जुन्या करारात ख्रिस्ताच्या आगमनाचे भाकित कोठे करण्यात आले आहे?