प्रश्नः
पापाची व्याख्या काय आहे?
उत्तरः
पापाचे वर्णन बायबलमध्ये देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन (योहानाचे 1 ले पत्र 3:4) आणि देवाविरुद्ध बंड असे केले आहे (अनुवाद 9:7; यहोशवा 1:18). पापाची सुरूवात लूसिफरने झाली, तो शक्यतः देवदूतांत सर्वात सुंदर आणि सामर्थ्यशाली असा होता. आपल्या पदाने संतुष्ट नसल्यामुळे, त्याने देवापेक्षा उंच पद प्राप्त करण्याची इच्छा धरली, आणि येथेच त्याचे पतन, आणि पापाची सुरूवात झाली (यशया 14:12-15). सैतान ह्या नव्या नावाने, तो एदेन बागेत मानवजातीसाठी पाप घेऊन आला, जेथे त्याने तीच भुरळ पाडून आदाम आणि हव्वेची परीक्षा घेतली, "तुम्ही देवासमान व्हाल." उत्पत्ती 3 देवाविरुद्ध आणि त्याच्या आज्ञेविरुद्ध आदाम आणि हव्वेच्या बंडाचे वर्णन करते. त्या वेळपासून, पाप मानवजातीच्या सर्व पिढ्यांत पसरले आणि आम्ही, आदामाच्या वंशजांनी, त्याच्यापासून पापाचा वारसा मिळविला. रोमकरांस पत्र 5:12 आम्हास सांगते की आदामाद्वारे पापाचा जगात प्रवेश झाला, आणि म्हणून मृत्यू सर्व मनुष्यांपर्यंत पसरला कारण "पापाचे वेतन मरण आहे" (रोमकरांस पत्र 6:23).
आदामाद्वारे, पापाच्या अंतर्जात प्रवृत्तीने मानववंशात प्रवेश केला, आणि मानवजात स्वभावतःच पापी ठरली. जेव्हा आदामाने पाप केले, तेव्हा त्याचा अंतस्थ स्वभाव त्याच्या बंडाच्या पापाने बदलून गेला, आणि त्यास आध्यात्मिक मृत्यू आणि दुराचरण लाभले जे त्याच्यानंतर येणार्या सर्वांस प्राप्त होणार होते. आम्ही पाप करतो म्हणून पापी नाही; तर, आम्ही पाप करतो कारण आम्ही पापी आहोत. ह्या लाभलेल्या दुराचरणास वारश्याने लाभलेले पाप म्हणून जाणले जाते. ज्याप्रमाणे आपणास आपल्या आईबापांकडून शारीरिक गुणवैशिष्ट्ये वारश्याने लाभतात, त्याचप्रमाणे आदामापासून आमचा पापमय स्वभाव आम्हास वारसा म्हणून मिळाला आहे. स्तोत्र 51ः5 मध्ये दावीद राजा ह्या मानव स्वभावाच्या पतीत दशेविषयी शोक करतो : "पाहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे."
दुसर्या प्रकारच्या पापास माथी मारण्यात आलेले पाप म्हणून ओळखले जाते. ह्या ग्रीक शब्दाचा उपयोग अर्थशास्त्राच्या आणि कायद्याच्या क्षेत्रात केला जातो, ज्याचे भाषांतर "लादणे, माथी मारणे" असे आहे ज्याचा अर्थ आहे "एखाद्या व्यक्तीजवळील वस्तू घेऊन ती दुसर्याच्या खात्यात टाकणे." मोशेचे नियमशास्त्र दिले जाण्यापूर्वी, वारश्याने मिळालेल्या पापामुळे जरी मनुष्य पापी होते, तरीही पापाचा दोष मनुष्याच्या लेखी जोडण्यात आला नव्हता. नियमशास्त्र दिल्यानंतर, नियमशास्त्राचे उल्लंघन करून करण्यात आलेली पापे त्यांच्या लेखी जोडण्यात आली (रोमकरांस पत्र 5:13). नियमशास्त्राच्या उल्लंघनाचा दोष मनुष्यांवर टाकण्यापूर्वीही, पापाचा अंतिम दंड (मृत्यू) राज्य करीत राहिला (रोमकरांस पत्र 5:14). आदामापासून तो मोशेपर्यंत, सर्व मानवजात, पापाच्या आधीन होती, मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध (जे त्यांच्याजवळ नव्हते) त्यांच्या पापमय कृत्यांमुळे नव्हे, तर त्यांनी स्वतः वारश्याने मिळविलेल्या पापमय स्वभावामुळे. मोशेनंतर, मनुष्ये आदामापासून वारश्याने लाभलेल्या पापामुळे आणि देवाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर लादण्यात आलेल्या पापामुळे मृत्यूच्या आधीन होते.
देवाने आरोपणाच्या अथवा लेखी जोडण्याच्या सिद्धांताचा उपयोग त्यावेळी मानवजातीच्या लाभासाठी केला जेव्हा त्याने विश्वासणार्यांचे पाप येशू ख्रिस्ताच्या खात्यात जोडले, ज्याने त्या पापाचा दंड — मृत्यू वधस्तंभावर चुकविला. जरी तो पातकी नसला, तरीही आमचे पाप येशूवर लादून, देवाने त्याच्याशी अशी वागणूक केली जणूकाही तो पापी होता, आणि त्याला संपूर्ण जगाच्या पापांसाठी मरण पत्करावे लागले (योहानाचे 1 ले पत्र 2:2). हे समजणे महत्वाचे आहे की पापाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला, पण त्याला तो आदामापासून कधीही वारश्याने मिळाला नव्हता. त्याच्या शुद्ध आणि सिद्ध स्वभावास पातकाचा स्पर्शही नव्हता. जरी त्याने कुठलेही पाप केले नाही, तरी त्याच्याशी अशी वागणूक करण्यात आली जणूकाही तो मानवजातीने केलेल्या सर्व पापांचा दोषी असावा. त्याऐवजी, जशी देवाने आमची पापे ख्रिस्ताच्या लेखी जोडली, त्याचप्रमाणे त्याने ख्रिस्ताचे नीतिमत्व विश्वासणार्यांस दिले आणि आमच्या खात्यात त्याचे नीतिमत्व जोडिले (करिंथकरांस 2 रे पत्र 5:21).
तिसर्या प्रकारचे पाप हे व्यक्तिगत पाप होय, जे दररोज प्रत्येक मनुष्य प्राण्याद्वारे घडते. आम्हास आदामापासून पापमय स्वभाव वारश्याने लाभला आहे, म्हणून आम्ही वैय्यक्तिक, व्यक्तिगत पापे करतो, वरकरणी निरागस दिसणार्या असत्यांपासून तो खूनापर्यंत सर्वकाही. ज्यांनी येशू ख्रिस्ताठायी विश्वास ठेविलेला नाही, त्यांना त्यांच्या ह्या व्यक्तिगत पापांचा, तसेच वारश्याने लाभलेल्या व माथी मारण्यात आलेल्या पापाचा दंड भोगावा लागेल. तथापि, विश्वासणारे पापाच्या सनातन दंडापासून — नरक आणि आध्यात्मिक मृत्यू — मुक्त झाले आहेत पण आता आम्हाला पापाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्यही लाभले आहे. आता व्यक्तिगत पाप करावे किंवा नाही ही निवड आम्ही करू शकतो कारण आमच्याठायी वास करणार्या, आम्ही पाप करीत असतांना आम्हास पवित्र करणार्या व आम्हास त्यांची जाणीव करून देणार्या पवित्र आत्म्याद्वारे पापाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आमच्याठायी आहे (रोमकरांस पत्र 8:9-11). आमची व्यक्तिगत पापे देवाजवळ कबूल केल्यानंतर आणि त्यांच्यासाठी क्षमा मागितल्यानंतर, आमचे त्याच्याशी सिद्ध सहभागित्व व सान्निध्य स्थापित होते. "जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतींपासून शुद्ध करील" (योहानाचे 1 ले पत्र 1:9).
आम्हा सर्व जणांवर वारश्याने लाभलेल्या पापामुळे, आमच्या लेखी जोडण्यात आलेल्या पापामुळे, आणि व्यक्तिगत पापामुळे दंडाज्ञा झाली आहे. ह्या पापाचा एकमात्र दंड म्हणजे मृत्यू आहे (रोमकरांस पत्र 6:23), फक्त भौतिक मृत्यू नव्हे तर सार्वकालिक मृत्यू (प्रकटीकरण 20:11-15). देवाची स्तुती असो, वारश्याने लाभलेले पाप, लेखी जोडण्यात आलेले पाप, आणि व्यक्तिगत पाप सर्व येशूच्या वधस्तंभावर खिळण्यात आले आहे, आणि आता तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे "त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे" (इफिसकरांस पत्र 1:7).
English
पापाची व्याख्या काय आहे?