settings icon
share icon
प्रश्नः

दैवी तरतूद काय आहे?

उत्तरः


दैवी तरतूद ही देवाचे शासन आहे ज्याद्वारे तो ज्ञान आणि प्रेमाने विश्वातील सर्व गोष्टींची काळजी घेतो आणि त्यांचे मार्गदर्शन करतो. दैवी तरतुदीचा सिद्धांत असा दावा करतो की सर्व गोष्टींवर देवाचे संपूर्ण नियंत्रण आहे. त्याचे सार्वभौमत्व संपूर्ण जगावर (स्तोत्रसंहिता 103:19), भौतिक जगावर (मत्तय 5:45), राष्ट्रांच्या गोष्टींवर (स्तोत्रसंहिता 66:7), मनुष्यांच्या भविष्यावर (गलतीकरांस पत्र 1:15), मनुष्यांचे यश आणि अपयश यावर (लूक 1:52), आणि त्याच्या लोकांचे संरक्षणावर (स्तोत्रसंहिता 4:8) आहे. हे विश्व योगायोगाने किंवा नशिबाने नियंत्रित होते या संकल्पनेच्या थेट विरोधात हा सिद्धांत आहे.

दैवी तरतुदीद्वारे देव त्याच्या इच्छा पूर्ण करून घेतो. त्याचा उद्देश पूर्ण होईल याची तो काळजी घेतो. देव मनुष्यांच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतो आणि नैसर्गिक गोष्टींच्या आधारे कार्य करतो. निसर्गाचे नियम हे विश्वातील देवाच्या कार्यापेक्षा जास्त नाहीत. निसर्गाच्या नियमांना अंतर्भूत शक्ती नाही; त्याऐवजी गोष्टी सामान्यपणे कश्या झाल्या पाहिजे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवाने ठरवलेली ही तत्वे आहेत. ते फक्त “नियम” आहेत कारण देवाने त्यांना आदेश दिला आहे.

दैवी तरतुदीचा मनुष्याच्या इच्छाशक्तीशी कसा संबंध आहे? आपल्याला माहित आहे की मनुष्याला स्वेच्छेचे स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्याला हे सुद्धा माहित आहे की देव सार्वभौम आहे. हे दोन सत्य एकमेकांशी कसे संबंधित आहेत हे समजणे आपल्यासाठी अवघड आहे, परंतु या दोन्ही सत्याबद्दलची उदाहरणे आपण वचनामध्ये पाहू शकतो. तार्ससचा शौल स्वेच्छेने मंडळीचा छळ करत होता, परंतु, प्रत्येक वेळी, तो देवाच्या तरतुदीच्या विरोधामध्ये कार्य करत होता (प्रेषितांची कृत्ये 26:14).

देव पापाचा तिरस्कार करतो आणि तो पाप्यांचा न्याय करेल. देव पापाचा निर्माता नाही, तो कोणालाही पापाची भुरळ पाडत नाही (याकोबाचे पत्र 1:13), आणि तो पापाकडे कानाडोळा देखील करत नाही. त्याचवेळी देव स्पष्टरीतीने काही प्रमाणापर्यंत पापाची अनुमती देतो. त्याला पापाचा द्वेष असला तरीही तात्पुरती परवानगी देण्याचे कारण त्याच्याकडे असले पाहिजे.

वचनामध्ये दैवी तरतुदीचे उदाहरण योसेफाच्या कथेमध्ये पहावयास मिळते. देवाने योसेफाच्या भावांना त्याचे अपहरण करण्याची, त्याला गुलाम म्हणून विकण्याची, आणि अनेक वर्षापर्यंत त्याच्या मृत्यूबद्दल त्यांच्या वडिलांशी खोटे बोलण्याची अनुमती दिली. हे दुष्ट होते आणि देव असंतुष्ट होता. तरीही, त्याचवेळी, त्यांच्या सर्व पापांनी एकत्रित मिळून अधिक चांगल्यासाठी कार्य केले: योसेफाचा शेवट मिस्रमध्ये झाला, जेथे त्याला प्रधानमंत्री बनवण्यात आले. योसेफाने त्याच्या पदाचा उपयोग दुष्काळाच्या सात वर्षाच्या काळात मोठ्या प्रदेशातील लोकांना तग धरण्यास मदत करण्यासाठी केला – ज्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा देखील समावेश होता. जर योसेफ दुष्काळ सुरु होण्याच्या आधी मिस्रमध्ये नसता, तर इस्राएली लोकांच्या समवेत लाखोंनी लोक मेली असते. देवाने योसेफाला मिस्रला कसे नेले? त्याने दैवयोगाने त्याच्या भावांना पाप करण्याचे स्वातंत्र्य दिले. देवाच्या दैवी तरतुदीला उत्पत्ती 50:15-21 मध्ये प्रत्यक्षरित्या स्वीकारले जाऊ शकत

दैवी तरतूद पापावर अधिराज्य गाजवण्याची आणखी एक स्पष्ट घटना म्हणजे यहूदा इस्कर्योत. देवाने यहुदाला खोटे बोलण्याची,फसवण्याची, लबाडी करण्याची, चोरी करण्याची, आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताला धोक्याने शत्रूंच्या हाती देण्याची परवानगी दिली. हा सर्व मोठा दुष्टपणा होता, आणि देव असंतुष्ट होता. तरीही, त्याचवेळी, यहुदाच्या सर्व योजना आणि कट यांनी मिळून मोठे चांगले कार्य झाले: मनुष्यजातीचे तारण. पापाबद्दलचे बलिदान म्हणून येशूला रोमी लोकांच्या हातून मरणे गरजेचे होते. जर येशू वधस्तंभावर खिळला गेला नसता, तर आपण आजही आपल्या पापामध्ये असतो. देवाने ख्रिस्ताला वधस्तंभापर्यंत कसे आणले? देवाने यहुदाला एकापाठोपाठ एक दुष्कृत्ये करण्यास दैवयोगाने परवानगी दिली. याबद्दल येशूने स्पष्टपणे लूक 22:22 मध्ये सांगितले आहे: “मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!”

येथे येशू हा देवाच्या सार्वभौमत्वाबद्दल (“मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो”) आणि मनुष्याच्या जबाबदारीबद्दल (“ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!”) दोन्हीबद्दल शिकवत आहे याची नोंद घ्यावी.

दैवी तरतुदीबद्दल रोमकरांस पत्र 8:28 मध्ये शिकली जाऊ शकते: “आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलवलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” “सर्व गोष्टी” म्हणजे “सर्व गोष्टी.” देवाच्या नियंत्रणात नाही असे कधीही नसते. सैतान त्याच्या परीने कितीही वाईट करू दे, तरीही दुष्ट जे जगाला दुभागत आहे ते शेवटी चांगला हेतू साध्य होण्यासाठी कार्य करते. आता आपण बघू शकत नाही तरीही. परंतु आपण हे जाणतो की त्याच्या योजना चांगल्या आहेत आणि तो काही कारणास्तव गोष्टी घडण्यासाठी परवानगी देतो. हे सैतानाला निराश करत असेल. तो काहीही करू देत, त्याला हे कळून चुकले की त्याच्या योजना निष्फळ आहेत आणि शेवटी काहीतरी चांगलेच घडते.

दैवी तरतुदीचा सिद्धांत पुढीलप्रमाणे सारांशीत केला जाऊ शकतो: “अनंतकाळापर्यंत, त्याच्या इच्छेनुसार सल्लामसलत करून, देवाने जे घडेल ते ठरवले; तरीही कोणत्याही अर्थाने देव पापाचा निर्माता नाही; तसेच मानवी जबाबदारी झटकली जाऊ शकत नाही.” प्राथमिक साधने ज्यांच्या द्वारे देव त्याच्या इच्छांना पूर्ण करतो त्या द्वितीय कारणांमुळे होतात (उदाहरणार्थ निसर्गाचे नियम आणि मनुष्यांच्या निवडी). दुसऱ्या शब्दात, देव त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अप्रत्यक्षपणे कार्य करतो.

कधीकधी देव त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षपणे कार्य करतो. या कार्यांना आपण चमत्कार म्हणतो. एक चमत्कार म्हणजे देवाकडून, थोड्या वेळासाठी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोष्टींच्या नैसर्गिक क्रमांमध्ये बदल करून वरचढ होणे होय. दिमिश्काच्या वाटेवर शौलावर पडलेला लख्ख प्रकाश हा थेट देवाच्या हस्तक्षेपाचे एक उदाहरण आहे (प्रेषित 9:3). पौलाच्या बिथुनियाला जाण्याच्या योजनेची निराशा करणे हे देवाच्या अप्रत्यक्ष मार्गदर्शनाचे एक उदाहरण आहे (प्रेषित 16:7). ही दोन्ही उदाहरणे त्यांच्या कार्यामध्ये दैवी तरतुद दाखवणारी आहेत.

असे काही लोक आहेत जे असे म्हणतात की, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सर्व गोष्टींना व्यवस्थित करण्याच्या संकल्पनेमुळे स्वतंत्र इच्छेच्या कोणत्याही शक्यतेचा नाश होतो. जर देवाच्या संपूर्ण नियंत्रणात असेल तर आपण घेतलेल्या निर्णयामध्ये खरोखर स्वातंत्र्य कसे असू शकेल? दुसऱ्या शब्दात, स्वतःची इच्छा अर्थपूर्ण ठरण्यासाठी, काही गोष्टी देवाच्या सार्वभौम नियंत्रणाच्या पलीकडे असणे आवश्यक आहे – उदाहरणार्थ., मानवी निवडीची संभाव्यता. युक्तिवादासाठी गृहीत धरू की हे खरे आहे. नंतर काय? जर देवाचे सर्व संभाव्यतांवर नियंत्रण नसेल, तर तो आपल्या तारणाची खात्री कशी देऊ शकतो? पौल फिलीप्पैकरांस पत्र 1:6 मध्ये असे सांगतो की, “ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल.” जर देवांचे पूर्ण नियंत्रण नसेल, तर हे अभिवचन, आणि बाकीची सर्व दैवी अभिवचने संशयाच्या भोवऱ्यात येतात. जर भविष्य पूर्ण प्रकारे देवाच्या हातात नसेल, तर आमचे तारण पूर्ण होईल याची आम्हाला पूर्ण सुरक्षा नाही.

अजून पुढे, जर देवाचे नियंत्रण सर्व गोष्टींवर नसेल, तर तो सार्वभौम नाही, आणि जर तो सार्वभौम नाही, तर मग तो देव नाही. म्हणूनच, संभाव्यतांना देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर ठेण्याची किंमत असा विश्वास की देव हा खरोखर देव नाही. जर आपली स्वतःची इच्छा दैवी तरतुदींना चिरडत असेल, तर मग शेवटी देव कोण आहे? आपण आहोत. पवित्र शास्त्रासंबंधी वैश्विक दृष्टीकोन असलेल्या कोणालाही हा निष्कर्ष अस्वीकार्य असेल. दैवी तरतूद आपले स्वातंत्र्य नष्ट करत नाही. त्याऐवजी, दैवी तरतूद आपले स्वातंत्र्य विचारात घेते, आणि देवाच्या असीम ज्ञानाने, देवाच्या इच्छेची पूर्तता करण्याचा मार्ग निश्चित करते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

दैवी तरतूद काय आहे?
© Copyright Got Questions Ministries