settings icon
share icon
प्रश्नः

आध्यात्मिक युद्धाविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः


जेव्हा आम्ही आध्यात्मिक युद्धाविषयी विचार करतो तेव्हा दोन मुख्य चुका घडतात — गरजेपेक्षा जास्त महत्व आणि गरजेपेक्षा कमी महत्व. काही लोक प्रत्येक पाप, प्रत्येक संघर्ष, आणि प्रत्येक समस्येचे खापर दुरात्म्यांवर फोडतात ज्यांस बाहेर काढण्याची गरज असते. इतर लोक आध्यात्मिक क्षेत्राकडे आणि ह्या वस्तुस्थितीकडे की बायबल आम्हास सांगते की आमचा लढा आध्यात्मिक बळांविरुद्ध आहे, पूर्णपणे कानाडोळा करतात. यशस्वी आध्यात्मिक युद्धाची किल्ली बायबलमध्ये समतोल शोधणे होय. येशूने कधी कधी लोकांमधून भूते काढली; इतर वेळा त्याने दुरात्म्याचा उल्लेख न करता लोकांस बरे केले. प्रेषित पौलाने ख्रिस्ती विश्वासणार्‍यास आज्ञा दिली की त्यांनी स्वतःमधील पापाविरुद्ध युद्ध करावे (रोमकरांस पत्र 6) आणि सैतानाच्या युक्तींचा विरोध करण्यासंबंधी आम्हास इशारा देतो (इफिसकरांस पत्र 6:10-18).

इफिसकरांस पत्र 6:10-12 म्हणते, "शेवटी, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान् होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरिता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे." ही वचने आम्हास काही महत्वपूर्ण सत्ये शिकवितातः आम्ही केवळ प्रभुच्या सामर्थ्यात बळ धरून राहू शकतो, देवाची शस्त्रसामुग्री आमचे रक्षण करते, आणि आमचा लढा हा शेवटी ह्या जगाच्या दुष्ट आध्यात्मिक शक्तींविरुद्ध आहे.

इफिसकरांस पत्र 6:13-18 हे देव आम्हास देत असलेल्या आध्यात्मिक शस्त्रसामुग्रीचे वर्णन आहे. आम्हाला सत्याचा कटिबंध बाधून, नीतिमत्वाचे उरस्त्राण, शांतीची सुवार्ता, विश्वासाची ढाल, तारणाचे शिरस्त्राण धारण करून, आत्म्याची तलवार घेऊन, आणि आत्म्यामध्ये प्रार्थना करण्याद्वारे खंबीरपणे उभे राहावयाचे आहे. आध्यात्मिक युद्धात ही आध्यात्मिक शस्त्रसामुग्री काय दर्शविते? आम्ही सत्य जाणले पाहिजे, सत्यावर विश्वास धरला पाहिजे, आणि सत्य बोलले पाहिजे. आम्ही ह्या वस्तुस्थितीवर अवलंबून राहिले पाहिजे की आमच्यासाठी ख्रिस्ताने केलेल्या बलिदानामुळे आम्हास नीतिमान घोषित करण्यात आले आहे. आम्हाला कितीही विरोधास तोंड द्यावे लागले तरीही आम्ही सुवार्तेची घोषणा केली पाहिजे. आम्हास आमच्या विश्वासात ढळता कामा नये. आमच्यावर कितीही आक्रमणे होत असली तरीही आम्ही देवाच्या अभिवचनांवर विश्वास धरला पाहिजे. आमचा अंतिम बचाव आम्हास लाभलेल्या तारणाचे आश्वासन आहे, असे आश्वासन जी कोणतीही आध्यात्मिक शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. आमचे आक्रमक हत्यार म्हणजे देवाचे वचन होय, आमची आपली मते आणि भावना नव्हेत. आणि आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आणि इच्छेत प्रार्थना केली पाहिजे.

येशू हा आध्यात्मिक युद्धात परीक्षेचा प्रतिकार करण्याचे आमचे सर्वोत्तम उदाहरण होय. जेव्हा अरण्यात येशूची परीक्षा घेण्यात आली तेव्हा त्याने सैतानापासून होणार्या प्रत्यक्ष हल्ल्यास कसे तोंड दिले ते पाहा (मत्तय 4:1-11). प्रत्येक परीक्षेस "असे लिहिले आहे" ह्या शब्दांनी तोंड देण्यात आले. जीवंत देवाचे वचन हे सैतानाच्या परीक्षांविरुद्ध सर्वाधिक सामर्थ्यवान शस्त्र होय "मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे" (स्तोत्र. 119:11).

आध्यात्मिक युद्धासंबंधाने एक सावधगीरीचा शब्द देणे भाग आहे. येशूचे नाव जादूचा मंत्र नव्हे ज्याने दुरात्मे आमच्या पुढून पळ काढतील. स्कीवाची सात मुले याचे एक उदाहरण आहे की जेव्हा लोक त्यांस न दिलेल्या अधिकाराचा उपयोग करतात तेव्हा काय घडते (प्रेषितांची कृत्ये 19:13-16). मुख्य स्वर्गदूत मिखाएलने सुद्धा आपल्या सामर्थ्याने सैतानास दटाविले नाही तर तो म्हणाला, "प्रभु तुला धमकावो!" (यहूदाचे पत्र 1:9). जेव्हा आपण सैतानाशी बोलू लागतो, तेव्हा आपण हव्वेप्रमाणे मार्गातून भटकण्याचा धोका पत्करतो (उत्पत्ती 3:1-7). आमचे लक्ष देवावर असले पाहिजे, दुरात्म्यांवर नव्हे; आम्ही देवाशी बोलतो, त्यांच्याशी नव्हे.

सारांश म्हणजे, आध्यात्मिक युद्धात यशस्वितेचा किल्ल्या काय आहेत? आपण देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहतो, आपल्या स्वतःच्या नव्हे. आपण देवाची पूर्ण शस्त्रसामुग्री धारण करतो. आपण शास्त्रवचनाचे सामर्थ्य ओढून घेतो — देवाचे वचन ही आत्म्याची तलवार आहे. आम्ही चिकाटीने व पवित्रतेने प्रार्थना करतो, आणि देवास विनंती करतो. आम्ही खंबीरपणे उभे राहतो (इफिसकरांस पत्र 6:13-14); आम्ही देवाच्या अधीन होतो; आम्ही सैतानाच्या कार्याचा प्रतिकार करतो (याकोबाचे पत्र 4:7), हे जाणून की सैन्याचा प्रभु आमचा रक्षक आहे. "तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही" (स्तोत्र 62:2).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आध्यात्मिक युद्धाविषयी बायबल काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries